चिंचपाडा : नवापूर तालुकास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन चिंचपाडा येथील Smt. D. G. Agrawal Memorial Senior Secondary School येथे २३ व २४ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
१४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या विविध गटांत स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत आत्मविश्वास, शिस्त आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.
स्पर्धेच्या उद्घाटनावेळी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रती समर्पण, मेहनत, शिस्त आणि जिद्द निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला. तालुका क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी व क्रीडा प्रभारी यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे कामकाज पार पडले. पंचांचे निर्णय निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने घेण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे CEO रघुनाथ निरंजन अग्रवाल यांनी क्रीडा समितीला मार्गदर्शन केले. अध्यक्ष निरंजन ओमप्रकाश अग्रवाल, उपाध्यक्ष संतोष राधेश्याम शर्मा आणि संचालक मनीष ओमप्रकाश अग्रवाल यांनी सहभागी विद्यार्थी, शिक्षक व क्रीडा अधिकाऱ्यांचे स्वागत करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. उपप्राचार्य अभिषेक द्विवेदी यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
PET शिक्षक नितीन राजपूत, सुहास वळवी आणि जयपाल राजपूत यांनी मैदानाची तयारी, क्रीडा साहित्य व अन्य व्यवस्थांची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली. सहभागी खेळाडू व शिक्षकांसाठी शाळेने हॉस्टेल व डे-बोर्डिंगसह आवश्यक सुविधांचे नियोजन केले. शाळेची शिस्त, नियोजन आणि आदरातिथ्याबद्दल सहभागी शाळा व क्रीडा अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
दोन दिवसीय स्पर्धेमुळे नवापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासह स्पर्धात्मक अनुभव घेण्याची संधी मिळाली. उत्साह, शिस्त, जिद्द आणि खिलाडूवृत्तीच्या वातावरणात स्पर्धेची यशस्वी सांगता झाली.





